जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ संपन्न
मुंबई, दि. ७ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून आरोग्य विषयक योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळेल आणि त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त तथा मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह राज्यातील विविध आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत असून आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच नागरिकांनी आपल्या निरोगी आरोग्य राखण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा व नियमित व्यायाम करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातील जनतेचा आरोग्य विभागावर विश्वास आहे. कोविडच्या काळात त्याची प्रचिती सर्वांना आली असून लोकांचा हा विश्वास आरोग्य विभागाने अधिक दृढ करण्यासाठी कसोशीने व कर्तव्य तत्परतेने काम करावे असेही प्राध्यापक शिंदे म्हणाले.
कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास आरोग्य विषयक खर्चात 70% पर्यंत बचत होणार आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी, एक्सरे, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय, डायलेसिस अशा अत्याधुनिक सुविधा आता मोफत उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विषयक विविध योजनांची व्यापक प्रचार व प्रसिद्धी होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यासोबत सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी लसीकरण मोहिमेची घोषणा झाली. ‘प्रीव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या संकल्पनेनुसार, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय, आरोग्य संस्थांच्या निरीक्षण प्रणालीचे उद्घाटन, बांधकाम प्रकल्पांच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ, तसेच CPR थेरपीसारख्या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण उपक्रमांचाही शुभारंभ आज करण्यात आला. या सर्व उपक्रमांचा उद्देश म्हणजे नागरिकांना वेळीच आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे आहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे विशेष सन्मान करण्यात आले. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपली सेवा कर्तव्यबुद्धीने केल्यास राज्याची आरोग्यसेवा आणखी गतिमान होण्यास बळ मिळणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी, ‘आरोग्यं धनसंपदा’ या मंत्राचा उच्चार करत संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेचा संकल्प पुन्हा एकदा नव्याने करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन देखील मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.
या आरोग्य सेवा योजनांचा झाला शुभारंभ.
- ई-सुश्रुत (एचएमआयएस सिस्टम) संकेतस्थळाचे विस्तारीकरण शुभारंभ
- महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे (मुंबई नर्सिंग होम कायदा) ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र वितरण शुभारंभ
- राज्यातील 6 जिल्ह्यांत 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ
- राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामाच्या ऑनलाईन संनियंत्रण व पाठपुरावा सॉफ्टवेअरचे उद्घाटन
- गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (9 ते 14 वर्षे वयोगट) अभियान – कर्करोगासंबंधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी
- महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ – आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा खुली
- महाराष्ट्र राज्यात सीपीआर प्रशिक्षणाचे उद्घाटन व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
- आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ
आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान.
- राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा – मोतीबिंदू शस्त्रक्रिया – प्रथम – बीड, द्वितीय – धाराशिव
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा – प्रथम – नांदेड, द्वितीय – पालघर, लातूर महानगरपालिका
- मोठ्या (मोठे) शस्त्रक्रिया करणारे १०० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय – प्रथम – उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, कोल्हापूर, द्वितीय – उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, अधिकाधिक मोठ्या (मोठे) शस्त्रक्रिया करणारे ५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय – प्रथम – उपजिल्हा रुग्णालय देगलूर, जिल्हा नांदेड, द्वितीय – उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड, परभणी
- अधिकाधिक मोठ्या (मोठे) शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण रुग्णालय प्रथम – ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, जिल्हा लातूर, द्वितीय ग्रामीण रुग्णालय माहूर, जिल्हा नांदेड
- गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत सर्वात जास्त संस्थांना राष्ट्रीय पातळीवर प्रमाणित करणारा जिल्हा प्रथम – लातुर, द्वितीय धाराशिव
- जास्त प्रसुती करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) – प्रथम – प्राथमिक आरोग्य केंद्र साईवन ता. डहाणू जिल्हा पालघर, द्वितीय – प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदूर्णी ता. जामनेर जिल्हा जळगाव
- जास्त प्रसुती करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (महानगरपालिका) – नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आकुर्डी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
- जास्त प्रसुती करणारे ग्रामीण रुग्णालय – प्रथम ग्रामीण रुग्णालय धडगाव, जिल्हा नंदुरबार, द्वितीय ग्रामीण रुग्णालय स्पर्श सस्तूर, ता. लोहारा जिल्हा धाराशीव
- आरबीएसके कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा (विद्यार्थी तपासणी, हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया). प्रथम कोल्हापूर, द्वितीय – पुणे
- असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम – सातारा द्वितीय वाशीम
- सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणारा जिल्हा (सिकलसेल तपासणी) प्रथम नागपुर द्वितीय नाशिक
- उल्लेखनीय कामगिरी करणारे विशेष नवजात शिशु काळजी कक्ष (एसएनसीयू) – प्रथम डागा रुग्णालय, नागपुर द्वितीय उपजिल्हा रुग्णालय, जव्हार जिल्हा पालघर
- उल्लेखनीय कामगिरी करणारे पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) – प्रथम – उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ, द्वितीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली
- मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमय) कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम ठाणे, द्वितीय नांदेड
- पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्हा प्रथम धाराशीव
- पाच वर्षात सातत्याने मातामृत्यू कमी करणारा जिल्हा – प्रथम रायगड
- सर्वात जास्त इन-हाऊस डायलिसिस करणाऱ्या आरोग्य संस्था प्रथम – डायलिसीस सेंटर, चंद्रपुर; द्वितीय – जिल्हा रुग्णालय, गडचिरोली
- उल्लेखनीय कामगिरी करणारे अतिदक्षता कक्ष (आयसीयू) – जिल्हा रुग्णालय धुळे
- राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम गोंदिया, द्वितीय धाराशीव
- राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय काम करणारी महानगरपालिका: प्रथम मालेगाव, महानगरपालिका, द्वितीय धुळे महानगरपालिका
- कुष्ठरोग निर्मलन कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा प्रथम चंद्रपुर, द्वितीय सातारा
- जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा : प्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला, द्वितीय जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशीव
- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा: प्रथम जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम, द्वितीय जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक
- वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी महानगरपालिका – प्रथम वैद्यकीय आरोग्य अधिकारी, (सांगली महानगरपालिका), द्वितीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी (पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
- उल्लेखनीय कामगिरी करणारे 100 खाटांचे रुग्णालय प्रथम उपजिल्हा रुग्णालय कराड जिल्हा सातारा, द्वितीय उपजिल्हा रुग्णालय, शहापूर जिल्हा ठाणे
- उल्लेखनीय कामगिरी करणारे महिला रुग्णालय प्रथम महिला अकोला, द्वितीय महिला रुग्णालय, अमरावती
- किडनी ट्रांसप्लांट मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे रुग्णालय – विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती
- आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी – ग्रामीण भाग- हिंगोली जिल्हा, शहरी भाग – पनवेल महानगरपालिका